बीड : मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सुरू झाला असून राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण भावातील लढत जिल्हा परिषद निवडणुकीत रंगणार हे नक्की.
बीड जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेल्या वेळी भाजप आघाडी आणि राष्ट्रवादी आघाडीकडे 29-29 असं संख्याबळ असताना टॉसवर राष्ट्रवादीचं नशीब फळफळलं आणि विजयसिंह पंडित अध्यक्ष झाले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात राष्ट्रवादीनं जो कारभार केला आहे तो पाहता ही निवडणूक त्यांना सोपी नाही हे नक्क. तर दुसरीकडे आता सेना-भाजप युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांसमोर जिंकण्याचं आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीशी टक्कर देण्यासाठी भाजप सज्ज असून यावेळी आम्ही पूर्ण बहूमत मिळवू असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
बीड जिल्हा तसा गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला. मात्र मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपला परळीत पराभव पत्करावा लागला होता. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीत गटबाजी उफाळून आली आहे. एकीकडे जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातच पुतणे संदीप क्षीरसागर यांनी आव्हान उभं केलंय तर दुसरीकडे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या सारखा मोहरा शिवसेनेच्या गळाला लागला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर राज्याच्या प्रचाराची जबाबदारी असल्यानं ते जिल्ह्यात किती जोर लावणार हा देखील प्रश्न आहेच. मात्र राष्ट्रवादीलाच यश मिळेल असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेनेची देखील ताकद आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना टाळून राष्ट्रवादी आणि भाजपची वाटचाल अवघड आहे. जिल्ह्यात संदीप क्षीरसागर यांची काकू नाना आघाडी आणि विनायक मेटे यांचा नवा पक्ष कुणाची गणितं बिघडवणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.