जितेंद्र शिंगाडे, नागपूर : आम्ही तुमच्याकडून कायद्याचे पालन करून घेऊ... मात्र, आम्ही स्वतः कायदा पाळणार नाही... आणि तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला बदडून काढू... अशी औरंगजेबाच्या मोगलाईशी तुलना करता येण्याजोगी वर्तवणूक आहे नागपूर पोलिसांची...
२६ वर्षांच्या स्वप्निल तुपे या तरुणाला नागपूर पोलिसांनी बेदम मारलंय... त्यानं केलेला गुन्हा समजला तर तुम्हालाही धक्का बसेल... इतरांना कायदा पाळायला लावणारे पोलीस स्वत: कायदा का पाळत नाहीत? असा सवाल त्यानं पोलिसांना केला आणि पोलिसांच्या दृष्टीनं स्वप्नील गुन्ह्यास पात्र ठरला.
...त्याचं झालं असं की नागपूरच्या झीरो चौकात सीटबेल्ट न बांधता वाहन चालवणाऱ्या पोलिसांचे त्याने फोटो घेतले. इथेच पोलिसांचा इगो हर्ट झाला आणि स्वप्निलला मारहाण करत पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. त्याच्यावर पोलीस कायद्यातील कलम ११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
स्वप्नील हा कुणी गुंड मवाली नाही... तर तो समाज शास्त्राचा विद्यार्थी आहे. एका एनजीओमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीही करतो. त्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीबाबत नागपूर पोलिसांनी आता मौन बाळगलंय.
सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीद वाक्य... पण वर्दीच्या आवेशात बहुदा पोलीस ते विसरुन गेलेत... त्यामुळे इतरांना नियमानं वागण्यास सांण्यापूर्वी पोलिसांनी स्वत:ही नियम पाळावेत ही माफक अपेक्षा...