दीपक भातुसे, www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. काँग्रेस मुंबईत १६९ जागा लढवणार आहे, तर त्यांच्या कार्यालयातून तब्बल अडीच हजार अर्ज वितरित झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस ५८ जागा लढवणार असून ४९८ जण उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आघाडी जाहीर झाली असताना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर उमेदवार निव़डीचं आव्हान उभं ठाकलं आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या वाट्याला १६९ जागा आल्या आहेत. मात्र १६९ जागांसाठी इच्छूक तब्बल अडीच हजार आहेत. या अडीच हजार अर्जातून १६९ उमेदवार निवडणं ही पक्षासाठीसुद्धा कसरत ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचीही अवस्था फार काही वेगळी नाही. मुंबईत राष्ट्रवादी ५८ जागा लढवणार आहे तर त्यांच्याकडील इच्छूकांची संख्या ४९८ आहे. त्यामुळं ५८ उमेदवार निवडताना राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. जागा कमी आणि इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दोन्ही पक्षांना बंडखोरीची भीतीही तेवढ्याच प्रमाणात आहे. कारण सत्तेपुढं पक्षनिष्ठा गौण ठरत असल्यामुळं नगरसेवकपद मिळवण्याच्या इर्षेने दोन्ही पक्षात बंडखोरी अटळ आहे.