www.24taas.com, ठाणे
ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर जितेंद्र आव्हाड आता पुन्हा एकदा टीकेचं लक्ष्य ठरू लागले आहेत. नेत्यांचा पोरकटपणा आणि स्टंटबाजी नडली अशा शब्दात पालकमंत्री गणेश नाईक यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे.
ठाण्यातला राष्ट्रवादीचा पराभव ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. ठाणे महापालिकेत यंदा सत्तेची संधी होती मात्र नेत्यांमधल्या थिल्लरपणामुळे ही संधी गेली असा घणाघात नाईकांनी केला आहे. ठाण्यातल्या पराभवामुळे जितेंद्र आव्हाडांचं नेतृत्व पुन्हा एकदा उघडं पडलं आहे. सत्तेच्या गप्पा हाकणारे आव्हाड आता वरिष्ठांच्या टीकेचे धनी ठरू लागले आहेत. गणेश नाईकांनी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
आपसातल्या हेवेदाव्य़ांमुळे सत्तेपासून दूर राहिलो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. ठाण्यातील दोन नेत्यांनी बंडखोर उमेदवार उभे केले नसते तर पालिका जिंकता आली असती असे नाईक म्हणाले. नाईक यांच्यावर ठाणे जिल्हा परिषदेची जबाबदारी होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. नाईक यांचे खासदार पुत्र संजीव नाईक यांच्याकडे मनपा निवडणुकीची काही प्रमाणात सुत्रे होती.