आदर्श घोटाळा : १४ आरोपी आणखी अडचणीत

आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १४ आरोपी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या आरोपींवर जन्मठेपेची शिक्षा असलेल्या आरोपांअतर्गतही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयनं विशेष कोर्टात दिली आहे.

Updated: May 29, 2012, 10:11 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १४ आरोपी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या आरोपींवर जन्मठेपेची शिक्षा असलेल्या आरोपांअतर्गतही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयनं विशेष कोर्टात दिली आहे.

 

याप्रकरणी सात आरोपींनी केलेल्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करताना सीबीआयनं ही माहिती दिलीय. कलम ४०९  आणि ४६७ अन्वये जनतेचे सेवक असताना फसवणूक आणि विश्वासघात, खोटे दस्तावेज तयार करणे यासारख्या आरोपांअतर्गत ही कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत आवश्यक ते पुरावे गोळा करण्याचं काम सुरु असल्याची माहिती सीबीआयनं कोर्टाला दिलीय. याअंतर्गत ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर जन्मठेपेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

दक्षिण मुंबईतल्या ३१ मजली आदर्श सोसायटीच्या जमिनीचा ताबा देण्याची मागणी संरक्षण मंत्रालयानं राज्य सरकारकडं केलीये. संरक्षण मंत्रालयानं तशी नोटीसच महाराष्ट्र सरकारला पाठवलीये. दोन महिन्यात आदर्शची जमीन हस्तांतरीत करावी, अन्यथा राज्य सरकार आणि आदर्श सोसायटीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात केस दाखल केली जाईल, असं नोटीशीत म्हटले आहे.

 

संरक्षण मंत्रालयाच्यावतीन अँड. धीरेन शहा यांनी ही नोटीस पाठवलीये. या नोटीसीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडं अनेकांचं  लक्ष लागले आहे.   आदर्शची जमीन हस्तांतरीत करण्याची मागणी संरक्षण मंत्रालयानं राज्य सरकारकडं केलीये. संरक्षण मंत्रालयानं तशी नोटीसच महाराष्ट्र सरकारकडे पाठवली आहे.