www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेनं कृत्रिम पावसासाठी इस्त्रायल पॅटर्न वापरण्याचा निर्णय घेतलायं. यासाठी पालिकेनं इस्त्रायलमधील मेटऑर कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हीडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय.
यंदा पावसानं पाठ फिरविल्यामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या २०० दिवसांचाच पाणीसाठा आहे. त्यामुळं मुंबईकरांची पाणी कपात वाढण्याची शक्यता आहे. मुंबईकरांवरचं हे पाणीसंकट कमी करण्यासाठी मुंबई महापालिका तलाव क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार आहे. हा कृत्रिम पाऊस इस्त्राइल तंत्रज्ञान पद्धतीनं पाडण्याचा पालिकेच्या जलविभागाचा प्रयत्न आहे. या इस्त्राइल पॅटर्नसाठी पालिकेनं इस्त्राइलमधील मेटऑर कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हीडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती मुंबईचे महापौर सुनिल प्रभू यांनी दिलीय.
पालिकेनं २००९ मध्ये कृत्रिम पावासाचा प्रयोग मोडकसागर तलावात अग्नी एव्हीशन कंपनीच्या विमानानं केला होता. त्यावेळी पावसाळी ढगांवर विमानातून सिल्व्हर नायट्रेड आणि सोडीयम क्लोराईडची फवारणी केली होती. यासाठी पालिकेनं आठ कोटी रुपयांचा खर्च केला होता. मात्र कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. त्यामुळं पालिकेनं आता कृत्रिम पावसासाठी इस्त्राइल पॅटर्नवर विश्वास टाकलाय.
.