मुंबईत म्हाडाची ३००० घरे उभी राहणार

मुंबईत घर घेणं ही प्रत्येकांची इच्छा असते. मात्र सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट झालेली आहे. यातच 'म्हाडा' ही सर्वसामान्याच्या मदतीला धावून आली आहे.

Updated: Mar 14, 2012, 11:27 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत घर घेणं  ही प्रत्येकांची इच्छा असते. मात्र सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट झालेली आहे. यातच 'म्हाडा' ही सर्वसामान्याच्या मदतीला धावून आली आहे. म्हाडा मुंबईत आणखी ३०५९ घरे बांधणार आहेत. तेव्हा लवकरच आपल्याला अर्ज भरता येणार आहेत.

 

म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी आज प्राधिकरणाच्या बैठकीत पुढील वर्षाचा ५ हजार ५०९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. यात ९५० कोटी रुपयांची तूट दाखविण्यात आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा म्हाडाचा सन २०१२-१३ चा ९५० कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प आज मंडळाला सादर करण्यात आला.

 

मुंबईतील अतिरिक्त चटईक्षेत्रातून म्हाडाला ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल आणि त्यातून तूट कमी करता येईल, असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. म्हाडातर्फे राज्यात सुमारे सात हजार घरे बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या घरांसाठी जमीन खरेदी करून ती विकसित करण्यासाठी ९२० कोटी रुपयांची तर घरे खरेदी करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात बांधकामासाठी १ हजार ३२१ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले होते.