मुंबई महापालिकेत संपात सहभागी झालेल्या ४० हजार कामगारांची दिवाळी बोनसविना उजाडली तरी, दिवाळीच्या दिवशीच मुंबई हायकोर्टाने या कर्मचाऱ्यांनाही साडेसात हजार रुपये बोनस देण्याचा आदेश दिला. पण १४ नोव्हेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीत जर कर्मचारी हरले तर हे पैसे त्यांना परत करावे लागणार आहेत.
२० सप्टेंबरला झालेल्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना बोनस न देण्याचा निर्णय आयुक्त सुबोध कुमार यांनी घेतला होता. त्याविरुद्ध महापालिका कर्मचारी युनियनचे नेते शरद राव यांनी औद्योगिक कोर्टात धाव घेतली.
औद्योगिक कोर्टाने मात्र राव यांच्या बाजूने निर्णय देत, सर्व कामगारांना बोनस देण्याचे आदेश दिले. परतु आयुक्त सुबोधकुमार यांनी हार न मानता, त्याविरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान दिले. त्यामुळे हायकोर्टाने महापालिकेच्या बाजूने निर्णय देत बोनसला स्थगिती दिली होती.
आज दिवाळीच्या दिवशी मात्र या प्रश्नावर झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांनाही साडेसात हजार रुपये बोनस देण्यात यावा असे सांगितले. १ नोव्हेंबरपर्यंत हा बोनस कर्मचाऱ्यांना मिळावा. परंतु, १४ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत जर निर्णय कर्मचाऱ्यांच्या विरोधात लागला, तर हे पैसे पुढील पगारातून वळते करण्यात येतील, असे कोर्टाने स्पष्ट केले.