‘आदर्श’ राजकारणात अडकले ऋषिराज

आदर्शप्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंह यांची काल बदली करण्यात आली. केंद्र सरकारने त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत तडकाफडकी बदली केल्यानं एकच खळबळ उडालीय.

Updated: Jul 6, 2012, 01:01 PM IST


www.24taas.com, मुंबई 

 

आदर्श प्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंह यांची काल बदली करण्यात आली. केंद्र सरकारने त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत तडकाफडकी बदली केल्यानं एकच खळबळ उडालीय.

 

ऋषिराज सिंह हे आदर्श घोटाळ्याचा कसोशीनं तपास करत होते. पण, आता त्यांच्या जागी गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी केशव कुमार यांना नेमण्यात आलंय. ऋषीराज यांची रुटीन बदली असल्याची सारवासारव सरकारनं केलीय. ऋषिराज सिंग यांनी आदर्श प्रकरणी अतिशय कणखर भूमिका घेत अतिशय सफाईनं तपासकाम केलं. त्यांच्यावर अनेक मार्गानं दबावही आणण्यात आला होता. मात्र, हायकोर्टानं सीबीआयला तपास करण्यास हिरवा कंदील दिल्यानं त्यांनी थोड्याच अवधीत 13 जणांवर आरोपपत्र दाखल केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सीबीआयच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच ऋषिराजसिंग यांची बदली रुटीन होती का? याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.

 

दरम्यान, सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंह यांची बदली रद्द करण्याची मागणी भाजपनं केलीये. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना पत्र लिहणार आहेत. ऋषिराज सिंह यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता आदर्श घोटाळ्याचा तपास केला. हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असताना ऋषिराज यांची बदली करणं योग्य नाही, असा पवित्रा भाजपनं घेतलाय. त्यामुळं त्यांची बदली रद्द करुन त्यांना होते त्या पदावर ठेवून आदर्शचा तपास त्यांच्याकडेच सोपवावा अशी मागणी तावडे यांनी केली आहे.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x