www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत बलात्काराच्या तीन घटना उघडकीस आल्यात. दादर, कुर्ला आणि कांदिवली या मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर या घटना घडल्यानं अवघी मुंबईच हादरून गेलीय.
दादर
पश्चिम बंगालमधून नोकरीच्या शोधात मुंबईत आलेल्या एका ४९ वर्षाच्या महिलेवर दादर परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आलाय. पीडित महिला कौटूंबिक वाद झाल्यानं पश्चिम बंगालमधून नोकरीच्या शोधात मुंबईत आली होती. मुंबईतल्या दादर स्टेशनवर उतरलेल्या या महिलेला एका नराधमानं नोकरी देतो, असं अमिष दाखवलं. त्यानंतर टॅक्सीत बसवून तो तिला एका घरात घेऊन गेला. तिथं तिच्यावर त्यानं बलात्कार केला शिवाय तिच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमही लुटली.
पी़डित महिलेनं एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या मदतीनं पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ज्या ठिकाणी अत्याचार झाला, ते ठिकाण महिलेला ओळखता येत नसल्यानं तपासात अडचणी येत आहेत.
कांदिवली
मुंबईच्या कांदीवलीत एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. शनिवारी खेळण्यासाठी बाहेर गेलेल्या या चिमुरडीला अज्ञात नराधमानं पळवून नेलं. चिमुरडी अचानक गायब झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तीचा शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर ती जखमी अवस्थेत आढळून आली. दवाखान्यात दाखल केलं असता या चिमुरडीवर बलात्कार झाल्याचं उघड झालंय.
कुर्ला
लग्नाचं अमिष दाखवून मुंबईतल्या कुर्ल्यात एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. मुकेश कोठारी असं आरोपीचं नाव आहे.
कुर्ल्याच्या नेहरुनगर परिसरात तो राहणारा आहे. परिसरातल्याच एका महिलेशी त्यानं ओळख वाढवली. लग्नाचं अमिष दाखवत देशातल्या अनेक शहरांत त्यानं या महिलेला फिरवून आणलं. या काळात त्यानं अनेक वेळा तिच्यावर अत्याचारही केले. दरम्यान, मुकेश विवाहित असून फसवणूक झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर संबधित महिलेनं कुर्ल्याच्या नेहरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी मुकेश फरार झालाय.