www.24taas.com, मुंबई
लतादींदीचा हृदयाला भिडणारा स्वर, कवि प्रदीप यांच्या लेखणीतून उमटलेले अन् मनाचा ठाव घेणारे शब्द आणि संगीतकार सी. रामचंद्र यांची तालबद्ध चाल... तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण बोलतोय ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताबद्दल... प्रत्येक देशवासीयाला स्फूर्तीदायी ठरणाऱ्या या अनोख्या गीताला आज तब्बल पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.
शहिदांच्या अपार कर्तृत्वाला... त्यांच्या बलिदानाला सलाम करणारं हे एक राष्ट्रभक्ती गीत. कवि प्रदीप यांच्या धारदार लेखणीतून उमटले काळजाचा ठाव घेणारे शब्द... यातील एक अन् एक ओळ मनावर कोरणारी... हे गाणं कवि प्रदीप यांनी लिहीलं ते १९६२च्या भारत चीन युद्धानंतर. या युद्धातल्या शहिदांना आदरांजली म्हणून हे काव्य प्रदीप यांच्या लेखणीतून उतरलं. २६ जानेवारी १९६३ साली हे गाणं लता दीदींनी पहिल्यांदा गायलं ते तत्कालिन पंतप्रधान पंडीत नेहरु यांच्या समोर... दिल्लीच्या रामलीला मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लातदीदींचा हा आवाज घुमला आणि उपस्थित रोमांचित झाले. लतादींदीचा स्वर्गीय स्वर, कवि प्रदीप यांचे काळाजाला भिडणारे शब्द आणि सी रामचंद्र यांची अप्रतिम चाल या साऱ्यांचा सुरेख मिलाफ या गीतात झाला आणि हे गाणं ऐकताच पंडीत जवाहरलाल नेहरुही अक्षरश: गहिवरले... त्यांचे डोळे पाणावले. या गाण्याला आता पन्नास वर्ष पूर्ण झालीत. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांबद्दल त्यांच्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञताच या गाण्यातून प्रदीप यांनी मांडलीय.
कवि प्रदीप यांच्याच नाही तर लतादीदींच्या कारकिर्दीतलं हे एक अजरामर गीत ठरलं. आजंही आपल्या प्रत्येक कार्यक्रमात दीदी शहिदांना याच गाण्यातून आदरांजली अर्पण करतात आणि आजंही या स्वराने सारं वातावरण देशभक्तीनं भारावून जातं. देशवासियांना शहिदांचं स्मरण ठेवायला लावणाऱ्या... लक्ष-लक्ष जवानांच्या बलिदानाची आठवण करुन देणाऱ्या आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या गाण्याचं स्थानं म्हणूनच भारतीयांच्या मनात कायम अढळ आहे.