‘एमपीएससी’च्या घोळानंतर सरकार धडा घेणार?

परीक्षार्थींबरोबरच ‘झी २४ तास’नं परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. पण या सगळ्या गोंधळात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षार्थींच्या मनःस्तापाला जबाबदार कोण?

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 5, 2013, 10:33 AM IST

www.24taas.com, मुंबई
‘एमपीएससी’ची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आलीय. गेले चार दिवस प्रचंड गोंधळ आणि मनःस्ताप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षार्थींबरोबरच ‘झी २४ तास’नं परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. पण या सगळ्या गोंधळात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षार्थींच्या मनःस्तापाला जबाबदार कोण?
‘एमपीएससी’नं गेले चार दिवस जो काही घोळ घातला, त्यानं परीक्षार्थींना प्रचंड मनःस्ताप झाला. सर्व्हर क्रॅश झाल्यानं परीक्षार्थींचा सगळा डेटा करप्ट झाला. परीक्षा अवघी तीन दिवसांवर आली असताना हा सगळा बोजवारा उडाला होता. तरीही कुठल्याही परिस्थितीत सात एप्रिललाच परीक्षा घेण्याची ‘एमपीएसी’ आयोगाची दांडगी इच्छाशक्ती होती. फक्त दोन दिवसांत जवळपास पाच लाख परीक्षार्थींचे फॉर्मस पुन्हा भरुन होणार नाहीत. हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं. तरीही आयोगाचे अधिकारी परीक्षेवर ठाम होते. दोन दिवसांत परीक्षार्थी एकदम फॉर्म भरणार म्हणजे वेबसाईट हँग होणार, ग्रामीण भागात इंटरनेट सहज उपलब्ध नसतं, लोडशेडिंग असतं या गोष्टी आयोगानं गृहीतच धरल्या नाहीत. या सगळ्या सावळ्या गोंधळाविरोधात ‘झी २४ तास’नं आवाज उठवला आणि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोरदार लावून धरली.
विरोधकांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना करत सरकारला घरचा आहेर दिला.... तरीही ‘एमपीएससी’ आयोग मागे हटायला तयार नव्हतं. प्रोफाईल अपडेशनची मुदत संपायला काही तास राहिले असताना आयोगाला उशिराचं शहाणपण सुचलं आणि विद्यार्थ्यांसाठी ‘एमपीएससी’च्या मुंबई कार्यालयात मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. इतके दिवस गोंधळ सुरू असताना आयोगाला हे आधी सुचलं नाही का? परीक्षा चुकू नये म्हणून ग्रामीण भागातल्या परीक्षार्थींनी धावत धावत मुंबई गाठली. एवढा सगळा गोंधळ आणि मनःस्ताप झाल्यानंतर ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. परीक्षार्थींची मागणी आणि ‘झी २४ तास’च्या पाठपुराव्याला यश आलं आणि लाखो परीक्षार्थींना दिलासा मिळाला.

आता तरी परीक्षेच्या आधी परीक्षार्थींना प्रोफाईल अपटेड करण्यासाठी योग्य वेळ द्यावा, सगळ्या परीक्षार्थींनी वेळेत फॉर्मस अपडेट केले आहेत, त्याची खात्री करावी, परीक्षेसंदर्भातल्या सूचना परीक्षार्थींपर्यंत व्यवस्थित पोहोचाव्यात, आणि मुख्य म्हणजे परीक्षार्थींच्या फॉर्मसचा योग्य बॅकअप घ्यावा याची काळजी आयोग घेईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलीय.