मुंबई : वाचन आणि लिखाणाचा मोठा व्यासंग असलेले ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 71 वर्षांचे होते.
मुंबई विद्यापीठाचा समग्र इतिहास त्यांनी शब्दबद्ध केला. समाजशास्त्र, संस्कृती, भाषा, साहित्य याचा गाढा अभ्यास असलेल्या या सडेतोड, निःपक्ष आणि प्रामाणिक पत्रकाराला महाराष्ट्र पारखा झाल्याची भावना व्यक्त होतेय.
आपल्या १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लोकसत्ता या दैनिकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कल्पक संपादक म्हणून ते सर्वसामान्य वाचकांना परिचित होते. लोकसत्तामधल्या तारतम्य या प्रसिद्ध स्तंभलेखनामुळं तारतम्यकार म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
याव्यतिरिक्त इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसंच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक अशीही त्यांची ओळख होती. पत्रकारितेबरोबरच काही व्यक्तीचित्रंही त्यांनी लेखणीबद्ध केली आहेत.