मुंबई : सर्जिकल स्ट्राइक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच करू शकतात ज्यांची छाती 56 इंचाची नाही, त्यांनी सर्जिकल स्ट्राइकची भाषा करू नये, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला हाणला.
मुंबईतल्या मुलुंडमध्ये रावण दहन कार्यक्रमावेळी भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर युतीत वाकयुद्ध रंगले आहे. सुरुवात त्यांनी केली, अंत आम्ही करु, असा इशारा आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.
या राड्यानंतर शेलार यांनी सोमय्या यांची भेट घेतली. शिवसेनेच्या हल्ल्यामुळे प्रेरणा मिळाली असून भ्रष्टाचाराविरोधातला लढा सोमय्या आणि भाजप सुरुच ठेवणार असल्याचंही शेलार यांनी म्हटले आहे.