www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा सर्वच थरांतून तीव्र निषेध होतोय... यामध्येच सुरू झालं बांगड्यांचं राजकारण... याच फुटकळ राजकारणाचा धिक्कार करत ‘बांगड्या घालणाऱ्या मनगटाला कमी लेखणाऱ्या’ राज ठाकरेंना काही महिलांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.
गृहमंत्री आर आर पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांना आबांना बांगड्या धाडण्याचं आवाहन केलं... हा आदेश समजून मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनीही आबांना बांगड्या धाडण्याचा कार्यक्रम पार पाडला. या महिलांचं नेतृत्व केलं ते राज ठाकरे यांच्या पत्नी शालिनी ठाकरे यांनी... पण, इतर महिलांनी मात्र या बांगड्यांच्या राजकारणाचा धिक्कार करत राज ठाकरे यांना खडे बोल सुनावलेत.
पाहुयात काय म्हटलंय महिलांनी...
निलम गोऱ्हे, प्रवक्त्या, शिवसेना
रोगापेक्षा औषध भयंकर... असं हे राज ठाकरेंचं विधान आहे... आम्ही बांगड्या घालतो याचा अर्थ, महिला पोलीस, सैन्यातील महिला, लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार किंवा झाशीची राणी कमी प्रतीचे आहेत असं राज ठाकरेंना वाटतंय का?
वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या
राज ठाकरे हेही एका पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांची ही अशी प्रतिक्रिया असेल... बांगड्या भरा याचाच अर्थ स्त्रिया व्हा आणि स्त्रिया व्हा याचा अर्थ आपल्या समाजव्यवस्थेत दुबळं व्हा अशा अर्थानं घेतला जातो...
ज्यावेळेस एक महिला पत्रकार जसलोक हॉस्पीटलमध्ये आपल्या जीवनाशी झुंजतेय तसंच जीवंत राहून या सगळ्या प्रकाराविरोधात उभी राहतेय, माहिती देतेय... अशा वेळेस आम्ही बांगड्या घालणाऱ्या महिला दुर्बल आहोत असा चुकीचा मॅसेज राज ठाकरेंच्या वक्तव्यातून जातो. त्यांनी वापरलेलं प्रतिक हे चुकीचंच आहे.
कविता महाजन, लेखिका
राज ठाकरेंना `बांगड्या`च बर्या दिसल्या आणि त्याही म्हणे महाराष्ट्रातल्या त्यांच्या माता-भगिनींनी आराराबांना पाठवून त्यांचं घर बांगड्यांनी भरून टाकायचं. संदेश काय : ‘बांगड्या भरा आणि घरात चुलीपुढे बसा. तुमची इतकीच लायकी!’... चपला पाठवा, बुट पाठवा, सडकी अंडी-कुजके टॉमॅटो पाठवा... हज्जार गोष्टी दिसतील पाठवायला; पण यांना `परंपरेनुसार` बायकांच्या बांगड्याच आठवल्या. असं म्हणून आपण बायकांचा अपमान करतो आहोत, याची कणभरही जाणीव नाही आणि या मनसेच्या कार्यकर्त्याही खि-खि करत बांगड्या दाखवताहेत टीव्हीवर... इतका बिनडोकपणा यांच्या येतो कुठून? आणि आपण एका वाईट घटनेच्या निषेधासाठी जमलो आहोत की मनोरंजनासाठी? इतकी तर अक्कल हवी खिदळताना? राजकीय पक्षात जायचं म्हणजे अकला गहाणच टाकल्या पाहिजेत का? एकीलाही राज ठाकरेंना सुनवावं वाटू नये की, हे चुकीचं आणि अपमानजनक आहे!
आणि हे असले निषेध बायकांनीच का करायचे? तुम्ही काय टीव्हीवर असले `आदेश` देऊन मग झोपा काढणार? उतरा ना रस्त्यावर खरी जाणीव असेल तर बायकांच्या खांद्याला खांदा लावून. घरात काय बसताय? बलात्कार हा काय फक्त स्त्रियांचा प्रश्न आहे? आणि त्यांनीच फक्त स्वतःसाठी लढावं? अरे... त्यांच्यातूनच जन्मलात याची तरी आठवण आहे का?
रजनीताई पाटील, खासदार, काँग्रेस
हे अत्यंत चुकीचं विधान आहे. कारण ज्यावेळेला महिलांना समानतेचा अधिकार आपण मागतोय... अशावेळेस २१ व्या शतकात जर महिलांसाठी बांगड्या या कमकवुतेचं लक्षण मानात असाल तर ते चुकीचं आहे. तुमची राजकीय समिकरणं काय असतील ती असोत... पण एक महिला म्हणून अशा प्रकारे महिलांचा आणखी अपमान करू नका
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.