भाजपच्या आक्रमकपणाला लगाम, काँग्रेस-राष्ट्रवादीला नवी ऊर्जा

बिहार निवडणुकीच्या निकालाचे देशभर जसे पडसाद उमटत आहेत तसे पडसाद निश्चितच राज्यात उमटणार आहेत. एकीकडे सत्तेवर आल्यापासून आक्रमक असलेल्या भाजपला आपल्या आक्रमकपणाला मुरड घालावी लागणार आहे. 

Updated: Nov 10, 2015, 03:26 PM IST
भाजपच्या आक्रमकपणाला लगाम, काँग्रेस-राष्ट्रवादीला नवी ऊर्जा title=

 मुंबई : बिहार निवडणुकीच्या निकालाचे देशभर जसे पडसाद उमटत आहेत तसे पडसाद निश्चितच राज्यात उमटणार आहेत. एकीकडे सत्तेवर आल्यापासून आक्रमक असलेल्या भाजपला आपल्या आक्रमकपणाला मुरड घालावी लागणार आहे. 

तर दुसरीकडे भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने नाराज असलेल्या शिवसेनेचा आक्रमकपणा वाढला आहे. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे हतबल झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज्यात नवी ऊर्जा मिळणार आहे.

मागील पंधरा वर्ष राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील राज्यात घवघवीत यश मिळाले आणि सत्ताही मिळाली. ही सत्ता मिळाल्यानंतर राज्यातील भाजपाच्या नेत्यांचा आक्रमकपणा वाढला. हा आक्रमकपणा इतका वाढला की सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही भाजपाकडून किंमत दिली जात नव्हती. सरकारमध्ये स्थान असूनही शिवसेनेला भाजपाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नव्हती. मात्र आता बिहारच्या निवडणुकीनंतर देशतील भाजपाच्या नेत्यांचे पाय जसे जमीनवर आले आहेत, तसे राज्यातील भाजपा नेत्यांचे पायही जमीनीवर आले असून त्यांची भाषा आता बदलू लागली आहे.

एकीकडे भाजपाचा आक्रमकपणा कमी होणार असताना दुसरीकडे शिवसेना भाजपाविरोधात अधिक आक्रमक होताना दिसणार आहे. बिहारमधील भाजपाच्या पराभवामुळे जसा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांना आनंद झाला तसा आनंद शिवसेनेलाही झाला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये लिहून आलेल्या अग्रलेखावरून हे अधिक अधोरेखित होते. त्यामुळेच सामनामधून शिवसेनेने भाजपाला चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. नितीश-लालूंची दिवाळी, भाजपाचं दिवाळं अशी भाजपाला झोंबणारी हे़डलाईचं सामनाने दिली आहे.

बिहारमधील भाजपाच्या पराभवामुळे शिवसेनेचा आक्रमकपणा जसा वाढला तशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांनाही नवी ऊर्जा मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे हतबल झालेल्या विरोधकांना बिहारच्या निवडणुकीने नवसंजीवनी मिळणार आहे.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील निकालाने राज्यातील राजकारणाची दिशा बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपासाठी राज्यातील राजकारणाची वाट काहीशी बिकट असणार आहे.

राज्यात पुढील वर्षभरात २०० नगरपालिका, २७ जिल्हा परिषदा आणि मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यासारख्या महत्त्वाच्या १० महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या सगळ्या निवडणुकींना मिनी विधानसभेच्या निवडणुका म्हणून संबोधले जाते. या निवडणुकीत भाजपाची खरी कसोटी लागणार आहे. कारण लोकसभा आणि विधानसबेतील निवडणुक यश टिकवण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.