मुंबई : दिल्लीत आपने केंद्रात सत्ता असलेल्या भाजपचाही सुपडा साफ केला आहे. राज्यात सर्वात महत्वाची समजली जाणारी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील काळात होणार आहे. यात आप हा पक्ष भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
मुंबईतही अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आता दिल्लीतून मुंबई महापालिकेच्या मैदानात मुसंडी मारण्याची शक्यता वाढली आहे.
मुंबईत आपला लोकांची पसंती मिळाली, तर याचा खरा फटका शिवसेनेपेक्षाही भाजपला अधिक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असली तरी शिवसेनेचा मतदार शिवसेनेसोबतच असल्याचं दिसून आलं होतं.
मात्र भाजपच्या पाठिशी असलेला नवीन मतदार, जो लोकसभेत भाजप सोबत होता, तो आप सोबत जाण्याची शक्यताच मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दिल्लीत काँग्रेस पेक्षाही भाजपचा पराभव मोठा आहे, कारण काँग्रेस मैदानात कुठेच नाही, हे स्पष्ट होतं, पण केंद्रात ऐन तारूण्यात असलेलं भाजप असं भुईसपाट होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं.
या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही एमआयएमबरोबरच आम आदमी पार्टीने मुसंडी मारण्याची तयारी सुरू केल्याने स्वबळाचे दावे मागे घेऊन तडजोडीची भूमिका शिवसेना आणि भाजपला घ्यावी लागणार असे दिसत आहे.
आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील अभूतपूर्व विजयाचे पडसाद आज मुंबईत जागोजागी उमटल्याने, या पक्षाविषयी मुंबईच्या मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आपुलकीही असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा प्रभाव महापालिका निवडणुकीपर्यंत टिकविण्याचे आव्हान मुंबईतील आम आदमी पार्टीच्या नेत्यांसमोर आहे. गेल्या काही महिन्यांत या पक्षात अनेक जणांनी ये-जा केली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या काळात तर या पक्षाचे अस्तित्व दिसले नव्हते.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईतील काँग्रेसचे आव्हान संपुष्टात आले आहे, महापालिका निवडणुका सोप्या झाल्या, अशी शिवसेना-भाजपची समजूत होती. मात्र नव्या दमाने मुंबईत मुसंडी मारणाऱ्या आम आदमी पार्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी कबुली भाजप आणि शिवसेनेचे नेते देत असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.