मुंबई : काळबादेवी येथील गोकुळ निवास इमारत आग दुर्घटनेमध्ये बचावकार्य करताना शहीद झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांचे निधन होऊन बारा दिवसही उलटत नाहीत तोच पालिकेतील निष्ठूर अधिकार्यांनी त्यांच्या कुटुंबीयांमागे पालिकेचे दिलेले घर खाली करण्यासाठी नोटीस बजावली.
बाराव्याचे विधी सुरू असतानाच दारात हजर झालेल्या अधिकार्यांनी घर कधी खाली करताय, असा प्रश्न विचारून नेसरीकरांच्या हौतात्म्याची क्रूर चेष्टाच केली. कुटुंबाचा आधार हरपलेल्या नेसरीकर कुटुंबीयांना या प्रकारामुळे जबर धक्का बसला आहे.
पालिकेच्या अधिकार्यांनी कर्तव्य बजावल्याचा आव आणून आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले. नेसरीकरांच्या घरात बाराव्याचे विधी सुरू असतानाच दारात थडकलेल्या अधिकार्यांनी कुटुंबीयांना घर सोडण्याबाबत हटकले. नेसरीकरांच्या घरातील वातावरण भावूक असतानाच आणि कुटुंब धक्क्यातून सावरलेले नसतानाच या ‘कार्यतत्पर’ अधिकार्यांनी घर सोडण्याबाबतचे नियम कुटुंबीयांना सांगायला सुरुवात केली. ९० दिवसांत घर रिकामे करा, असे सांगत बजावले.
९ मे रोजी लागलेल्या आगीत होरपळलेले शहीद नेसरीकर यांचा २४ मे रोजी ऐरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या जोगेश्वरी येथील घरी आज बाराव्याचे विधी सुरू असतानाच झालेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांना मानसिक त्रास झाला. पालिकेने लेखी नोटीस बजावलेली नसली तरी ९० दिवसांत घर रिकामे नाही केले तर मग सहा महिन्यांनी बाजारभावानुसार पैसे भरावे लागतात, अशी आगाऊ माहितीही घरी थडकलेल्या या अधिकार्यांनी कुटुंबीयांना दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
नेसरीकर यांना सेवानिवृत्त व्हायला सात-आठ वर्षे शिल्लक होती. त्यामुळे तोपर्यंत तरी आम्हाला या घरात राहण्याची परवानगी द्यावी, नाहीतर नेसरीकरांच्या मुलाचे शिक्षण पूर्ण होण्यास तीन वर्षे शिल्लक आहेत तोपर्यंत तरी परवानगी द्यावी, अशी मागणी नातेवाईक शुक्लेश्वर चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी कॉंगे्रसचे प्रवीण छेडा यांनी स्थायी समितीमध्ये हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकरणी कोणते अधिकारी गेले होते, का गेले होते याची चौकशी करून कारवाईचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.