www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार तटस्थ राहणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
पुतणे धनंजय यांच्याविरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी शड्डू ठोकला असून, विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विधान परिषदेच्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाने अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना पाठिंबा जाहीर केला. धनंजय मुंडे यांनी कृष्णकुंजवर धाव घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
धनंजय मुंडे हे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्यासह काही महिन्यांपूर्वी भाजपला रामराम करून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात घेतले. त्यांनी नुकताच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला आहे. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली. त्यासाठीच ते कृष्णकुंजवर गेल्याचे म्हटले जात होते. मात्र, ही राजकीय भेट नव्हती तर ती सदिच्छा भेट होती, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.