www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठविण्यात येणार्याम सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्यानं तेही या निवडणुकीत उभं राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले हुसेन दलवाई , मुरली देवरा (काँग्रेस), प्रकाश जावडेकर (भाजप), वाय. पी. त्रिवेदी, जनार्दन वाघमारे (राष्ट्रवादी), राजकुमार धूत व भारतकुमार राऊत (शिवसेना) या सात सदस्यांची मुदत २ एप्रिल २०१४ रोजी संपत आहे.
या निवडणुकीत विजयासाठी ३७ मतांची आवश्यकता असून काँग्रेसचे २, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ उमेदवार सहज विजयी होतील. राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी बाहेरून ९ आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे, तर काँग्रेसकडे दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर काही मतं शिल्लक राहतील. शिवसेना आणि भाजपकडे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक लागणार्या मतांखेरीज जवळपास १९ मते अतिरिक्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढं लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय. त्याऐवजी राज्यसभेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्यानं तेही या निवडणुकीतील उमेदवार असतील.
विशेष तारखा
- या सात जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल.
- २१ जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
- २९ जानेवारी ही अंतिम मुदत असेल.
- ३१ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.