www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत आणि जिजू जनार्दन यांच्याविरुद्ध आणखी काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. ही माहिती मुंबई क्राईम ब्रान्चच्या वतीनं सह-आयुक्त हिमाशू रॉय यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई क्राईम ब्रान्चनं १४ मे रोजी काळाचौकी इथं रमेश व्यास या बुकीला अटक केली होती. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडील मोबाईल सीमकार्ड, लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलं होतं. यावरून रमेश व्यास हा भारत, पाकिस्तान आणि दुबईतील काही बुकींशी संपर्कात असल्याचं पोलिसांना माहिती मिळाली. हे बुकीज आयपीएलमध्ये खेळणाऱ्या काही क्रिकेटर्सशीही संपर्कात होते. त्यांचे मोबाईल नंबर पोलिसांना व्यासच्या डायरीत मिळाले.
त्यानंतर श्रीसंतनं आणि जिजू जनार्दननं मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रुम बुक केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या माहितीच्या आधारे वांद्रे भागातील संबंधित हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला. यावेळी श्रीसंत याच्या रुममधून पोलिसांना लॅपटॉप, आयपॅड, डेटाकार्ड, कॅश, डायरी, मोबाईल फोन अशा गोष्टी मिळाल्या तर जिजू जनार्दनच्या रुममधून मोबाईल, आयपॅड अशा वस्तू पोलिसांनी जप्त केल्या, अशी माहिती हिमांशू रॉय यांनी दिलीय.
या चौकशीतून मॅच फिक्सिंग प्रकरणी आणखीही काही माहिती हाती लागण्याची शक्यता हिमांशू रॉय यांनी व्यक्त केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.