विधान परिषद निवडणूक रविवारी, निवडणुकीत चुरस

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक रविवारी होतेय. दोन जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. 

Updated: Dec 26, 2015, 10:26 PM IST
विधान परिषद निवडणूक रविवारी, निवडणुकीत चुरस title=

मुंबई : मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक रविवारी होतेय. दोन जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. 

अपक्ष उमेदवाराच्या आव्हानामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झालीय. मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर जाणा-या दोन सदस्यासांठी रविवारी निवडणूक होतेय. शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे अशोक ऊर्फ भाई जगताप आणि अपक्ष उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. 

मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद लाड यांनी पक्षाशी बंडखोरी करीत निवडणुकीत प्रवेश केल्यानं चुरस वाढलीय. शिवसेना-भाजप ही निवडणूक युतीमध्ये लढवत आहे. 

दोन्ही पक्षाचे नगरसेवक फक्त पहिल्या पसंतीचीच मते देणार आहेत. त्यामुळे शिवसेनेला रामदास कदम यांच्या हमखास विजयाची खात्री आहे. काँग्रेस एनसीपीनंही आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय, पण लाड यांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढलीय.

लाड यांच्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं त्यांच्यामागे एनसीपीतीतल्याच एका गटाचं पाठबळ तर नाही ना असा काँग्रेसला संशय आहे. या निवडणुकीत मनसेनं तटस्थ राहाण्याची भूमिका घेतल्यानं विजयाची समीकरणं बदललीत.