www.24taas.com,मुंबई
आज मकर संक्रांत. जुने वैरभाव विसरुन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याचा दिवस. आज आप्त स्वकीयांना तिळगुळ देऊन सण साजरा केला जातो. तर देशात सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जातो. मध्य भारत आणि उत्तरेकडील राज्यात पतंगोत्सव साजरा केला जातोय.
या दिवसाला मोठं धार्मिक महत्वही आहे. मकरसंक्रांत तसा शेतीसंबधी सण आहे. मकरसंक्रांतीपासून उन्हाळ्याची सुरुवात होते. सुर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सुर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.
तिळगुळ घ्या गोड बोला अशा संवादातून प्रेम वृद्धींगत करण्याचा आणि संक्रमणाचा सण.मकर संक्रातीला पंतंगोत्सवाचंही मोठं आकर्षण आहे. दरम्यान, पतंगाच्या धारदार मांजामुळं पक्षांना आणि माणसांनाही इजा होत असल्यानं काळाजी घेण्याचं आवाहन संस्था, संघटनांनी केलंय. येवल्यातला पंतगोत्सव खास असतो. मात्र नुकतेच तिथंही धारदार मांजामुळं ३ जण जखमी झाले. त्यामुळं स्थानिक प्रशासनानं अशा मांज्याच्या विक्रीवर २० जानेवारीपर्यंत बंदी आणलीये.
आज पहाटे ६ वाजून ५९ मिनिटांनी मकर संक्रातीला सुरुवात झाली. २१ डिसेंबरपासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ झाला. त्या दिवसापासून दिनमान वाढू लागते. मकर संक्रातीला त्याच दिवशी प्रारंभ झालाय. खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी मकर संक्रातीचं महत्व विशद केलं.