उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतर सरांचं घुमजाव…

मनोहर जोशींच्या वक्तव्यानं सध्या शिवसेनेत फायलिन निर्माण झालंय. थेट नेतृत्वावर टीका करत पंतानी स्वत:वरच वादळ ओढवून घेतलं. पण...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 12, 2013, 10:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनोहर जोशींच्या वक्तव्यानं सध्या शिवसेनेत फायलिन निर्माण झालंय. थेट नेतृत्वावर टीका करत पंतानी स्वत:वरच वादळ ओढवून घेतलं. पण या वादळाचा संघटनेवर काहीच परिणाम झाला नाही उलट शिवसैनिकांच्या रोषालाच पंताना सामोर जावं लागल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे शेवटी पंतांना माघार घ्यावी लागलीय.
मनोहर जोशी... शिवसेनेत ज्येष्ठत्व मान्य असलेले हे नेतृत्व सध्या मात्र त्यांच्याच वक्तव्य़ानं वादळात सापडलंय आणि याला कारण ठरलयं ते दादरच्या एका कार्यक्रमातील पंताचं वक्तव्य... ‘बाळासाहेबांसारखं नेतृत्व असतं, तर एव्हाना स्मारक झालं असतं’ असं म्हणत मनोहर जोशींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच्या नेतृत्वावरच टीका केली होती. मनोहर जोशी हे खरंतर शिवसेनेच्या स्थापनेपासून सक्रिय असलेले कार्यकर्ते आणि सेनेच्या जहाल मुशीतून घडूनही आक्रमक नसलेलं नेतृत्व... शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पहिल्या फळीचे शिलेदार म्हणूनही जोशीसरांकडे पाहिले जातं. अर्थात या निष्ठेचे फळ त्यांना संघटनेनं वेळोवेळी अग्रक्रमानं दिलं हा इतिहास आहे. १९७६ साली मनोहर जोशींना शिवसेनेनेचं महापौर बनवलं. १९९० ला छगन भुजबळांची दावेदारी असतानाही मनोहर जोशीना विरोधी पक्षनेतेपद बहाल करण्यात आलं. १९९५ साली युतीने सत्तासोपान सर केलं तेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे जोशीसर होते. आणि १९९९ ला केंद्रात युतीची सत्ता येताच जोशीसरांना लोकसभा अध्यक्षपदाची शपथ घ्यायला लावणारे शिवसेनेचंच नेतृत्व होतं.

युतीची राज्यात सत्ता येताच इतर मातब्बर नेत्यांची दावेदारी असतानाही त्यांना बाजुला सारत ज्यावेळी जोशी सरांचे नाव जाहिर झालं त्यावेळी सरांना इतरांवर अन्याय होतोय त्याची आठवण नाही झाली... पण मुख्यमंत्रीपदावर नारायण राणेंची वर्णी लागताच मात्र त्यांची नाराजी दबक्या आवाजात बोलली जावू लागली. २००४ च्या पराभवानंतरही ज्येष्ठत्वाचा मान राखत बाळासाहेबांनी खासदारकीची उमेदवारी पंताना बहाल केली. पण जोशीसरांचा तुटलेला जनसंपर्क शिवसेनेला महागात पडला. त्यानंतर माहीम विधानसभेच्या निवडणुकीत आणि महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या धामधुमीत कार्यकर्त्यांच्या गराड्यात जोशीसर अभावानेच दिसले. पण पुन्हा एकदा लोकसभेचे पडघम वाजू लागले. शिवसेनेनं भाकरी परतायची ठरवली आणि मतदारसंघाचा धांडोळा घेत शिवसेनेनं महापालिकेचे स्थायी समितीचे राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्याचं ठरवण्यात आलं. त्यावेळी सरांमधल्या कार्यकर्त्यावर नेत्यानं विजय मिळवला आणि आपल्यालाच उमेदवारी हवीय हा हट्ट पंतानी धरला.
पण, मतदारसंघातल्या शाखांमध्येच पंत हरले. त्यानंतर शरद पवारांची आणि पंताची भेट झाली आणि या भेटीला मुलामा चढला तो एमसीएच्या निवडणूकीचा... या सगळ्यावरही नेतृत्व शांत होतं. पण, मनोहर जोशींनी नेतृत्वावर बोट तर ठेवलंच त्यावर कडी करत शिवसैनिकांना ‘सुर्याजी पिसाळ’ म्हणत पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडलंय.
मनोहर जोशी हे शिवसेनेतील जबाबदारीनं बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्याच जोशीसरांची नेतृत्वावरची टीका ही अनावधानाने आहे हे कसं समजायचं? जोशीसरांच्या या विधानावरुन त्यांच्यावर शिवसैनिकांनी टिका करायला सुरुवात केली. त्यानंतर शनिवारी सकाळीच मातोश्रीवरून सरांना बोलावणं आलं. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर या वादावर पडदा पडला असल्याचं सरांनी जाहीर केलंय.
खरंतर शिवसेनेवर मनोहर जोशींनी डॉक्टरेट केलीय आणि शिवसेनेच्या विचार मंथनावरील कार्यक्रमात नेतृत्वावरंच टीका करत मनोहर जोशीनी शिवसेनेत ‘फायलीन’ वादळ उभं केलं खरं... पण या फायलीन वादळाचा फटका जोशीसरांना सहन करावा लागणार, हेच चित्र सध्या दिसतंय.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला