'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!

म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.

Updated: May 22, 2015, 04:08 PM IST
'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला! title=

मुंबई : म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.

मुंबईत घरासाठी असंगाशी संग नको... भ्रष्ट अधिकारी, दलालांची साथ घेऊ नका... अधिकारी रिटायर होतील, दलाल निघून जातील... तुमच्यावर बेघर होण्याची वेळ येऊ शकते...

म्हाडाच्या शिवडी, परळ, करी रोड, लोअर परळ, दादर, भायखळा या पुनर्विकास झालेल्या इमारतीत राहणारे हे रहिवासी सध्या चांगलेच धास्तावले आहेत. ज्या घरात गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून हे ३२३ कुटुंबीय राहात आहेत. त्यांना म्हाडाने आता घुसखोर ठरवलंय. घर खाली करण्याची नोटीस बजावलीय. ही घरं या रहिवाशांनी म्हाडाकडून घेतली होती. मात्र आता म्हाडाच्या नोटीशीने रहिवासी चक्रावलेत. 

या रहिवाशांकडे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं देकार पत्र आहे. घराची स्टँप ड्युटी, भाडंही स्विकारण्यात आलंय. विजेच्या बिलापासून सर्व कागदपत्र नावावर आहेत. मात्र, हा प्रकार म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी घडवून आणल्याचं स्पष्ट झालंय. 

वेळोवेळी आलेले गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनीही सहानुभुतीपूर्वक विचार करण्याचं आश्वासन दिलं पण रहिवासी अजून संकटातच आहेत. 

म्हाडातले लाचखोर अधिकारी आणि दलाल यांच्या साखळीला आजवर कोणतीही शासकीय यंत्रणा आळा बसवू शकली नाही. म्हणूनच या लाचखोर अधिकारी आणि दलाल यांच्या संगनमताने इथल्या रहिवाशांवर घऱ गमावण्याची वेळ आलीय. 

त्यामुळे या ३२३ मराठी कुटुंबीयांचं काय होणार, त्यांना न्याय मिळणार का असे प्रश्न निर्माण होतात. सर्वसामान्यांना जाळ्यात पकडून त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि नंतर त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आणणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार हा यातला कळीचा मुद्दा आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.