www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली म्हाडा सोडतीतील ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होतेय. आजपासून ते २८ मे पर्यंत तुम्हाला म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येतील. आत्तापर्यंत नोंदणी प्रक्रियेत सुमारे ७ हजार अर्जदारांनी सोडतीसाठी नोंदणी केली आहे.
मे २0१४ सोडतीत पारदर्शकता जपण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी प्राथमिक माहिती दर्शवणारे रजिस्टर अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या रजिस्ट्रेशन अर्जात अर्जदाराचे नाव, पॅनकार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, अर्जदाराचे छायाचित्र देणे बंधनकारक आहे. मात्र, या माहितीची संगणकीय चाचपणी केल्यानंतर दुसर्याँ दिवशी ऑनलाईन अर्ज भरण्याचा संकेतांक मिळाल्यानंतर तुम्हाला अर्ज दाखल करता येईल. युजर अकाऊंटच्या आधारे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ६ मे रोजी दुपारी २ वाजता सुरू होऊन ३0 तारखेला संध्याकाळी ६ वाजता बंद होईल.
अर्जासोबत अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्ट ज्यांना द्यायचा असेल ते डिमांड ड्राफ्टसोबत अँक्सिस बँकेत २ जूनपर्यंत अर्ज देऊ शकतील. छाननीनंतर पात्र अर्जदारांची यादी ९ जून रोजी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असून त्यानंतर १५ जून रोजी सकाळी १0 वाजता वांद्रय़ातील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई व कोकण मंडळाच्या माध्यमातून ३१ मे रोजी काढण्यात येणार्या् २६४१ घरांच्या सोडतीची १५ एप्रिलच्या दुपारपासून सुरू होणारी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उत्तर विभागाच्या निवडणूक निरीक्षकांनी स्थगित करण्यची सूचना केली होती. ऐन आचारसंहितेच्या काळात म्हाडाकडून सोडतीची प्रक्रिया कशी काय राबवता? असं विचारत खुलासा मागवला होता. त्यानुसार म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी निरंजनकुमार सुधांशू यांनी कारणे स्पष्ट केली होती. त्यानुसार निवडणूक पार पडल्यानंतर म्हाडाच्या सोडत प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल झाल्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले. अर्ज भरण्याची प्रक्रिया २८ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.