www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पोलीस अधिका-यांच्या बदल्यांना पार्श्वभूमी काय असावी? त्या अधिका-यांची शक्तीस्थळं, जिथं बदली होतेय तिथली सामाजिक परिस्थिती, तिथल्या गुन्ह्यांचं प्रमाण आणि स्वरुप... पण किती बड्या नेत्याची शिफारस आणली आहे, यालाही महाराष्ट्रात महत्त्व असल्याचं दिसतंय. चार दिवसांपूर्वी राज्यातल्या दीडशे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या जागी आपल्या आवडीच्या अधिका-यांची वर्णी लागावी, यासाठी अनेक नेत्यांनी फिल्डिंग लावल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय.
पोलिसांची बदली करण्याचा अधिकार कोणाचा? महासंचालकांचा, गृहसचिवांचा, गृहमंत्र्यांचा की मुख्यमंत्र्यांचा... गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा सनातन वाद... या वादामुळेच कदाचित उत आलाय तो वशिलेबाजीला... आपल्या मर्जीतल्या पोलिस अधिका-यांना `मोक्या`च्या पोलीस ठाण्यात आणता यावं, यासाठी गृहराज्यमंत्र्यांपासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत शिफारशी केल्या जातायत. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. बदल्यांची कुणकुण लागल्यावरच अनेक जण अशी शिफारसपत्रं गोळा करायला सुरूवात करतात आणि ती पाठवूनही देतात...
पश्चिम नियंत्रण विभागातले अशोक बोरसे यांना ओशिवारा इथं आणण्यासाठी ऑस्कर काँग्रेसचे वजनदार खासदार फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. मरोळच्या सशस्त्र विभागातल्या प्रकाश आव्हारे यांच्यासाठी आमदार कालीदास कोळंबकरांनी फिल्डिंग लावली आहे. पंढरपूरचे दिनकर मोहिते यांना पंढरपूर शहर ठाण्यात आणवं यासाठी भारत भाळके यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली आहे. भिंवडीतल्या भोईवाड्याचे विठ्ठलराव देसाई यांना नवीन पनवेलमध्ये जाण्यात इंटरेस्ट आहे. यासाठी बाळासाहेब बोरगे यांनी पत्रप्रपंच केलाय. तुर्भ्याचे वरिष्ठ निरिक्षक एन.डी. कोकरे यांची बदली रबाळे एमआयडीसीमध्ये करावी यासाठी निलेश पारवेकर यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पत्र लिहिलंय. दिंडोशीचे एम.जे. भिंगारराव यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भानुदास माळी यांनी गृहमंत्र्यांकडे शिफारस करणारं पत्र लिहिलंय. सोलापूरचे वरिष्ठ निरिक्षक गजेंद्र मनसावळे यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यास आणण्यासाठी विधान परिषदेचे आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. याच मनसावळेंसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनीही शिफारसपत्र दिलंय. त्यांनीही मुख्यमंत्र्यांनाच हे पत्र पाठवलंय. मरोळच्या सशस्त्र विभागातूबन दादासाहेब बोरसे यांना साकीनाकल्याचा जायचंय. त्यासाठी माजी आमदार सदाशिव सकपाळ यांनी गृहमंत्र्यांकडे शिफारस केलीये. खासदार संजय निरुपम यांनी दोघांसाठी शिफासर केलीये. अंबादास पवार यांना कस्तुरबा पोलीस ठाण्यात आणण्यासाठी तर राजेंद्र ठाकूर यांची दिंडोशीला बदली करावी, यासाठी निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांसोबत पत्रप्रपंच केला. प्रकाश नाना जाधव हे सध्या गुन्हे अन्वेषण विभागात आहेत. त्यांना गोराईला बदलून न्यावं यासाठी रमेश ठाकूर यांनी फिल्डिंग लावलीये. रामराव सूर्यवंशी यांच्यासाठी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहिदास पाटील यांनी मुख्य़मंत्र्यांना पत्र पाठवलंय.
संबंधित पोलीस अधिकारी हे आपल्या परिचयाचे, मतदारसंघातले आहेत. त्यांचं कार्य चांगलं आहे, असा दाखला या नेत्यांनी दिलाय. राज्य पोलिसांच्या माहितीपुस्तिकेतल्या कलम ४१३ नुसार पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या बढत्यांसारख्या धोरणात्मक बाबींमध्ये राजकीय हस्तक्षेप करता येत नाही. असं झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. ही शिफारसपत्रं देणारे नेते आणि अधिका-यांवर कारवाई होणार का, झाली तर ती किती कठोर असणार, असा प्रश्न आहे...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.