मुंबई : मुंबईच्या महापौरपदाची लॉटरी शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर यांना लागलीय. शिवसेनेच्यावतीनं त्यांनी काल महापौरपदाचा अर्ज भरला.
महिला अनुसूचित जातीसाठी महापौरपद राखीव झाल्यानं शिवसेनेतून स्नेहल आंबेकर, यामिनी जाधव आणि भारती बावधने यांच्या नावाची चर्चा होती. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बी कॉम पदवीधारक स्नेहल आंबेकरांच्या नावाला पसंती दिली.
विद्यमान महापौरांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पूर्ण होत आहे. स्नेहल आंबेकर या अनुसूचित जाती वर्गातील मुंबईच्या पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत.
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने विक्रोळीतील वॉर्ड क्र. ११७ मधील डॉ. भारती बावधने आणि लोअर परळ येथील वॉर्ड १९४ मधील स्नेहल आंबेकर या दोन नगरसेविकांमध्ये या पदासाठी दावेदार असल्याचे बोलले जात होते. यात आंबेकर यांनी बाजी मारली. शिवसेनेतील यामिनी जाधव याही एससी प्रवर्गातील आहेत; परंतु, त्या खुल्या वॉर्डातून निवडून आल्याने त्यांचा पत्ता कापला गेला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.