www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिकेतील सत्तेचा वापर शिवसेनेचे पदाधिकारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थितपणे करून घेत आहेत. या पदाधिका-यांनी आपल्या मतदार संघातील वॉर्डसाठी कोट्यवधी रुपये बजेटमधून वळवले आहेत. तर दुसरीकडे विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डसाठी तुटपुंजी तरतूद केलीय. याविरोधात विरोधकांनी पालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगकडं दाद मागितलीय.
मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात असलेले स्थायी समिती अध्यक्ष राहूल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. साहजिकच महापालिकेतील पदाचा वापर निवडणुकीसाठी करुन घेणे आलेच. यातून सर्वाधिक निधीही पदरात पाडून घेणेही आलेच. यामध्ये महापौरही मागे राहिले नाहीत.
२०१४-१५ च्या बजेटमध्ये राहुल शेवाळे यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील सर्व वॉर्डसाठी चाळीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवाय स्वत:च्या वॉर्डसाठी साडेपाच कोटी रुपयांची तरतूद केलीय. महापौरांच्या वॉर्डसाठी तेरा कोटी सत्तर लाख रुपये तर शिवसेना गटनेते यशोधर फणसेंच्या वॉर्डसाठी साडेदहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. इतरांच्या वॉर्डमधील समाजमंदिरासाठी पाच ते दहा लाख दिले असले तरी महापौरांच्या वॉर्डमधील तीन समाजमंदिरासाठी पन्नास पन्नास लाखांची तरतूद करण्यात आलीय. जिमसाठी इतरांना पाच दहा लाखांची तरतूद असली तरी राहुल शेवाळेंच्या वॉर्डमधील अत्याधुनिक जिमसाठी पन्नास लाखांची तरतूद करण्यात आलीय.
मतदारांना आमीष दाखवण्यासाठी या निधीचा वापर होणार असल्याचा आरोप करत काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे महापालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करणारेत. गटनेत्यांच्या बैठकीत निधीचे वाटप झाले असून विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे मत राहुल शेवाळेंनी व्यक्त केलंय.
राहुल शेवाळे आता लोकसभेच्या मैदानात उतरले आहेतच शिवाय महापालिकेत सत्तेत असणा-या काही पदाधिका-यांना आमदारकीचे वेध लागलेत. त्यामुळं मतदारसंघ मजबुतीसाठी पालिका निधीचा अधिकाधिक वापर करण्याचे धोरण अवलंबल जातंय. यामध्ये विरोधी नगरसेवकांची झोळी मात्र रिकामी राहतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.