मुंबई : आपण गुजरातमधील मुस्लीम असल्याने मला मुंबईत वडाळा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घर नाकारण्यात आले, असा आरोप मिसबाह कादरी या तरुणीने केला आहे.
गुजरातमध्ये जन्मलेली आणि २००२ मधील दंगलीचे चटके सोसलेली मिसबाह कादरी ही तरुणी उच्चशिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात मुंबईत आली. कम्युनिकेशन प्रॉफेशनल म्हणून कार्यरत असलेल्या मिसबाह कादरीने मुंबईत घराचा शोध सुरु केला. मुस्लीम असल्याने अनेक सोसायट्यांमध्ये तिला घर नाकारण्यात आले, असा तिचा दावा आहे.
वडाळ्यातील संघवी सोसायटीमध्ये तिला घर मिळाले. या घरात दोन मुली भाड्याने राहत असून त्या हिंदू आहेत. या घराविषयीची माहिती तिला एका इस्टेट एजंटकडून मिळाली होती. घरात राहायला जाण्यापूर्वी त्या एजंटने मिसबाहला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास सांगितले. या इमारतीमध्ये मुसलमानांना घर दिले जात नाही. तुम्ही मुस्लीम महिलांप्रमाणे बुरखा घालून बाहेर पडू नका, अशी तंबीही तिला देण्यात आली, असे तिचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुस्लीम असल्याने काही त्रास झाल्यास याला बिल्डर, एजंट आणि रहिवाशी जबाबदार नाही, असे तिला लेखी लिहून द्यायला सांगितले गेले. घराची आवश्यकता असल्याने मिसबाहनेदेखील लेखी पत्र दिले. वडाळ्यातील घरात राहायला आली. घरातील अन्य दोन तरुणींनी मिसबाहला चांगले सहकार्य केले होते.
मात्र, सर्व सुरळीत सुरु असताना आठवडाभरानंतर संबंधीत एजंटने मिसबाहशी संपर्क साधून घर खाली करण्यास सांगितले. घर खाली न केल्यास पोलिसांना बोलवून तुझे सामान रस्त्यावर फेकून देऊ, अशी धमकी मला एजंटने दिली असल्याचे मिसबाह हिचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर मिसबाहने वडाळ्यातील घर खाली केले. याविरोधात तिने महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधीत बिल्डर आणि सोसायटीतील अन्य रहिवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.