दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाला आता चांगलाच जोर चढलाय. एकीकडे मित्रपक्ष भाजप अडचणीत असताना शिवसेनेनंही संधी मिळेल तिथं भाजपवर टीकेचे प्रहार सुरू केलेत. विधानसभा निवडणुकीआधी आणि सत्तेत सहभागी झाल्यावर भाजपकडून मिळालेल्या वागणुकीचा एकप्रकारे शिवसेना बदला घेत आहे. याशिवाय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकही त्याला कारणीभूत आहेच.
शिवसेनेची घट्ट सत्ता असलेल्या मुंबईत शिवसेनेला पहिला धक्का दिला तो त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपनेच. विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपनं शिवसेनेपेक्षा एक जागा जास्त जिंकून शिवसेनेच्या मुंबईतल्या वर्चस्वाला एकप्रकारे धक्काच दिला.
मुंबईत भाजपचे १५ तर शिवसेनेचे १४ आमदार निवडून आलेत.
शिवसेनेला हा धक्का देऊन भाजप नेते थांबले नाहीत. जिथे जिथे अपमानित करता येईल तिथे भाजप नेत्यांनी शिवसेनेचा अपमान केला, अडचणीत आणलं. मग ते सत्तेत सहभागी करून घेणे असो, मंत्रीपदे देणे असो अथवा मुंबई महापालिकेतील प्रकरणे बाहेर काढण्याबाबत विधाने असोत.. शिवसेनेचे मिळेत तिथे नाक दाबण्याचे उद्योग भाजपाने केले.
मात्र आता संधी शिवसेनेला मिळालेली आहे... सबके दिन आते हे.. त्यानुसार आता शिवसेनेचे दिवस आले आहेत. भाजपाचे पाच मंत्री विविध कारणावरुन अडचणीत आले. दोन मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप होऊ लागले आणि शिवसेनेने ही संधी साधून भाजपाला निशाणा करण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत झालेल्या अपमानाचा बदला जणू आता शिवसेनेचे नेते संधी मिळेल तिथे घेत आहेत.
यामागे निश्चितच भाजपाला बदनाम करण्याचा आणि त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. कारण भाजपा पक्ष जेवढा बदनाम होईल तेवढा त्याचा फायदा शिवसेनेला मिळणार आहे. भाजपाही शिवसेनेच्या या टीकेला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे.
मुंबई महापालिकेच्या 2017 च्या सुरुवातीला होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होईल की नाही याबाबत साशंकता आहे. समजा युती झाली तरी जास्तीत जास्त जागा जिंकून महापौरपद आपल्याकडे ठेवण्याचा दोन्ही पक्षाचा प्रयत्न असेल. यातूनच शिवसेना-भाजपामध्ये मुंबई महापालिकेत सत्ता स्पर्धा बघायला मिळणार आहे. या सत्तास्पर्धेत आपणच यशस्वी होण्यासाठी हे दोन्ही पक्ष आतापासूनच एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोप करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.