मुंबई : नियोजन आयोग रद्द करण्यात येणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी टीका केलीय. त्यांनी नियोजन आयोग रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्थेला धोकादायक असल्याची टीका केलीय.
15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योजना आयोग बरखास्त करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे योजना आयोगाच्या जागी नवी संस्था उभारण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोगाच्या जागी प्रस्तावित नव्या संस्थेबाबत जनतेची मतं मागवली आहेत. मोदींनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. नियोजन आयोगाऐवजी बनवण्यात येणाऱ्या नव्या संस्थेबाबत तुमच्या सूचनांचे स्वागत आहे, असं ट्विट मोदींनी केलं आहे. देशाची वाटचाल योग्य दिशेने व्हावी यासाठी योगदान देण्याची आणि आपल्या संकल्पना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी मोदी सरकारने इंटनेटच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.
mygov.nic.in या वेबसाईटवर एक पेज तयार करण्यात आलं आहे. यावर जनमतं मागवली आहेत. या वेबसाईटवर कोणीही रजिस्ट्रेशन करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतो.
नियोजन आयोग रद्द करण्यावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार तोफ डागली. तर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचा हा हल्ला समर्थपणे परतवून लावला. मोदी सरकार पुणे आणि नागपूर मेट्रोबाबत भेदभाव करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तर पुणे मेट्रोचा प्रस्ताव रखडण्याला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असा टोला गडकरींनी हाणला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.