मुंबई : येत्या २४ तासात कोकण, मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय.
मुंबई आणि उपनागरातील काही भागात वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.
राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही आज सकाळी अनेक भागात पाऊस पडला. त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. मात्र हा मान्सून नाही. या मान्सूनपूर्व सरी आहेत.
महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस येण्यास अजून वेळ लागणार आहे. गोवा, रत्नागिरी भागात उत्तर पश्चिम वारे असल्याने मान्सून कोकणच्या दिशेने वाहण्यास अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे मान्सून कोकणात दाखल होण्यास अजून दोन ते तीन दिवस लागणार आहेत, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहेत.
पुढील दोन दिवसांत तळ कोकणात वादळी वारा, वीजेच्या गडगडाटासह चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्या्या काही भागात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज आहे.
आज मुंबईसह उपनगरांतही मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली.. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना या मान्सूनपूर्व पावसानं मोठा दिलासा दिलाय.. सुमारे तासभर हा पाऊस सुरु होता. त्यामुळे बच्चे कंपनीलाही पहिल्या पावसात भिजण्याचा मोह आवरता आला नाही.