मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात नेतृत्व नसल्यामुळे शरद पवार यांना नेतृत्व करावं लागतंय, अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांनी उस्मानाबादच्या मोर्चावर टीका केली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तावडेंना प्रत्युत्तर दिलंय. राज्यातले नेते निष्प्रभ झाले नसून शेतकाऱ्यांचं दुःख समजून घेण्यासाठी पवार मोर्चात सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल ३४ वर्षांनी प्रत्यक्ष रस्त्यावरील मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी शरद पवार उस्मानाबादमध्ये दाखल झालेत. दुष्काळग्रस्त भागासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येतंय.
या आंदोलनात पवार यांच्यासह माजी खासदार पद्मसिंह पाटील, धनंजय मुंडे, महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्यासह अनेक नेते आणि मराठवाड्यातील पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.
३४ वर्षांपूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढण्यात आली होती. मोर्चानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी परिषद होणार आहे. त्यानंतर जिल्ह्याते कार्यकर्ते, पदाधिकार्यांशीही पवार थेट संवाद साधतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.