मुंबई : प्रचाराच्या 'सुपर सॅटर्डे'ला अनेक दिग्गजांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पण, एकाच वेळी जाहीरसभा सुरू होत्या. यावेळी, आपापसांत वितुष्ट असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणात एक अजब योगायोग पाहायला मिळाला.
राज ठाकरे यांची दादरमध्ये तर उद्धव ठाकरेंची वांद्र्याच्या बीकेसी मैदानात सभा आयोजित करण्यात आली होती. दोघांच्या सभेला रात्री 8 च्या दरम्यान सुरू झाली... दोघेही एकाच वेळी व्यासपीठावर उभे होते... आणि महत्त्वाचं म्हणजे, दोघांच्या भाषणाची सुरूवात मुख्यमंत्र्यांच्या आज झालेल्या पुण्यातील 'पारदर्शक' सभेची खिल्ली उडवण्यानंच झाली.
'आज, दुपारी पुण्यातली मुख्यमंत्र्यांची सभा पाहिली... संपूर्ण सभा पारदर्शक... आता, सभा लवकर संपवाल का? आमच्याकडे माणसं पाहिजे, असा निरोप आला आहे' असा टोमणा मारत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरूवात केली.
तर, 'पुण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत माणसं होती, पण त्यांचा कारभार पारदर्शक असल्यामुळे त्यांना गर्दी दिसली नाही... आणि ते न बोलता परत गेले' असं म्हणत राज ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांच्या रद्द झालेल्या सभेची खिल्ली उडवली.