www. 24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. महायुतीत मनसे घेण्याबाबत विषयी चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, राजकारणात काहीही होते. त्यामुळे चर्चाही होतच राहिल, अशी सावध भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी घेतली.
शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक संपलीय. लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत राज ठाकरे आणि मनसे यांच्या वाढत्या मैत्रीविषयी चर्चा झाली. तसंच हिंदुत्वाच्या मुद्यावरही बैठकीत खलबतं झाली.
हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे महायुतीत निर्माण झालेला तणाव, रिपाइंची नाराजी आणि संघटनात्मक चर्चा याबाबतही सेना नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. मात्र, राज ठाकरेंविषयी भाष्य करताना मनोहर जोशी म्हणाले, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंपुढे मैत्रीचा हात पुढे केला होता. त्यांनी त्याबाबत जाहीर प्रस्ताव ठेवला होता. परंतु राज ठाकरे यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा विषय आता शिवसेनेसाठी संपलाय.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाशी आमची युती कायम राहिलं, यात शंका नाही. त्यांनी जरी मनसेबाबत भाकीत केलं. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे युतीत काहीही दरार होणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.