मुंबई : अनेक वादात सापडलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यांनी लाल दिव्याच्या गाडीतून ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गेलेत. मात्र, गाडीचा लाल दिवा झाकलेला होता. त्यावरून खडसे राजीनामा देणार असल्याचे सूचीत झाले होते.
दरम्यान, काल रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत आले होते. रात्री त्यांनी पक्षाच्या नेत्यांची, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्याआधी दुपारी वर्षावर मुख्यमंत्री फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काहींशी याच विषयावर चर्चा झाली. या निर्णयानंतर खडसे यांनी राजीनामा देण्याचे ठरल्याचे म्हटले जात आहे.
पुण्यातील भोसरी येथील जागेची त्यांनी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावयाच्या नावाने केलेली खरेदी त्यांना भोवली. मंत्रीपदावर असताना स्वत:च्या खात्याअंतर्गत येणारा विषय त्यांनी स्वहीतासाठी वापरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या निदर्शनास आणू दिले. त्यामुळे खडसेंना आपले पद गमवावे लागलेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झालेली असताना त्याचा उत्साह एकीकडे साजरे होत होता. तर दुसरीकडे खडसे यांच्यावरील आरोपांमुळे भाजपाची देशभर बदनामी झाली. पक्ष एवढा बदनाम कधीच झाला नाही, शिवाय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने खडसे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची नावे आणि फोटो टाकून मुंबईभर पोस्टर लावल्याबद्दल श्रेष्ठींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणारा त्यांचा फोटो, हेही यामागील एक कारण होऊ शकते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत आले. रात्री त्यांनी पक्षाच्या नेत्यांची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. भ्रष्टाचार आरोप, अनेक वाद यामुळे भाजपची बदनामी झाली. ही बदनामी फार दिवस चालू ठेवणे पक्षासाठी घातक असल्याचे मत सगळ्यावेळी मांडले गेले, हे दुसरे कारण असू शकते.
खडसे यांचा राजीनामा देण्याचा हा निर्णय काही दिवस आधीच झाला होता, पण विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध पार पडू द्या असा सूर पक्षात होता. संघाने खडसेंविषयी फार चांगले मत दिले नव्हते. तसेच खडसेंमुळे मुख्यमंत्री फडणवीस अनेकवेळा अडचणीत आले होते. यामुळे हे तिसरे कारण.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी खडसे प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील असे जाहीर केले होते पण मुख्यमंत्र्यांना हा निर्णय दिल्लीतून अपेक्षीत होता. ते दिल्लीत गेले त्याहीवेळी याचे फायदे तोटे काय यावर चर्चा झाली होती. शेवटी नितीन गडकरींनी हे ऑपरेशन पार पाडावे असे ठरले आणि त्यानुसार पुढील सूत्रे हलली. आज सकाळी खडसेंना राजीनामा देण्यास सांगितले जाईल, असे ठरले होते. त्यानुसार त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.
खडसे हे ज्येष्ठ नेते होते. तसेच ते बहुजणांचे नेते म्हणून ओळखले जायचे. राज्याच्या राजकारणात त्यांचे महत्व वाढत होते. त्यामुळे त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी एक गट सक्रीय असल्याचे म्हटले जात आहे. तसेच नितीन गडकरी यांचे महत्वही तितकेच वाढत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बहुजणांचा नेता अशी ओळख त्यांची होत होती. त्यामुळे भविष्यात खडसे अन्य नेत्यांसाठी डोकेदुखी होऊ शकते, हेही कारण यामागे असल्याची कूजबुज सुरु आहे.