सचिन तेंडुलकर छोट्या मास्टर्ससाठी देवदूत

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि क्रिकेटचा देव छोट्या मास्टर्ससाठी देवदूत बनून आलाय. चिमुकल्यांच्या हृदयाच्या आजारावरील उपचारासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी वाडिया हॉस्पिटलला दहा लाख रुपये दान दिलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 22, 2014, 08:41 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि क्रिकेटचा देव छोट्या मास्टर्ससाठी देवदूत बनून आलाय. चिमुकल्यांच्या हृदयाच्या आजारावरील उपचारासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी जेरबाई वाडिया हॉस्पिटलला दहा लाख रुपये दान दिलेत.
या पैशांमधून उपचारासाठी लागणारी उपकरणं आणि इतर वस्तू खरेदी करण्यात येणार आहेत.. यावेळी गरीब मुलांसाठी मोफत ऑपरेशनचं आश्वासन दिलं. हृदयाच्या आजारानं त्रस्त असलेल्या चिमुकल्यांसाठी ९ फेब्रुवारीला मुंबईत लिटील हार्ट मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे. यात सगळ्याच वयोगटातले नागरिक सहभागी होऊ शकतात. या मॅरेथॉनमधून मिळणारा निधी चिमुकल्यांच्या उपचारासाठी वापरला जाणार आहे.
मी आणि माझ्या पत्नीच्यावतीने वाडिया रुग्णालयाला व्हेंटिलेटर विकत घेण्यासाठी १० लाख रुपये देणगी म्हणून देण्याची माझी इच्छा आहे. डॉ. यशवंत आमडेकर यांच्या या मोहिमेचा मी भाग असल्याचा अभिमान वाटत आहे. लोकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी तसेच निधी उभारण्यासाठी ही शर्यत होत आहे, असे सचिनने 'लिटल हार्ट्स' मॅरेथॉन शर्यतीच्या घोषणे दरम्यान सांगितले.
लहान मुलांमधील हृदयविकाराचा धोका लक्षात घेता, त्यादृष्टीने जनजागृती करण्यासाठी ९ फेब्रुवारीला सिद्धिविनायक मंदिर ते वाडिया रुग्णालय अशी ही मॅरेथॉन शर्यत रंगणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.