मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट अॅण्ड रनप्रकरणाचा तपास नीट न झाल्याचा ठपका जस्टिस अनिल रामचंद्र जोशी यांनी निकालपत्रात ठेवल्याची खुद्द उच्च न्यायालयानेच गंभीर दखल घेतली आहे.
अशा प्रकरणात तपास नीट न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते? याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यामुळे सलमानचा तपास नीट न करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे प्रकरण चांगलंच भोवण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याने अपघात केल्यावर त्याच्या रक्ताचे नमूने कसे घेतले जातात? हे नमूने कोठे ठेवले जातात? त्याची कोठे चाचणी होते? ही चाचणी किती वेळात होते? यासाठी राज्य शासनाकडे नेमकी काय यंत्रणा आहे? जेणेकरून या चाचणीत फेरफार होणार नाही याची शाश्वती मिळते, याची माहिती शासनाने न्यायालयात सादर करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
यावेळी न्यायालयाने दारू पिऊन रस्ते अपघात करणाऱ्याच्या लायन्सचा मुद्दा उपस्थित केला. दारू पिऊन माणसाचा बळी घेणाऱ्याला सत्र न्यायालयाने दोषी धरून शिक्षा ठोठावली असल्यास त्याचे लायसन्स काही दिवसांसाठी रद्द केले जाते व ठराविक दिवसांनी त्याला लायसन्स परत मिळते... हे चुकीचे आहे... रस्ते अपघातात एखाद्या प्राण्याचा जीव जाणे व माणसाचा बळी जाणे यामध्ये फरक आहे. हा फरक लक्षात घेऊनच लायन्सबाबत शासनाचे धोरण असायला हवे. कारण दारू पिऊन गाडी चालणाऱ्याने अपघात केल्यावर त्याच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होतो. या गुन्ह्यासाठी दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे लायसन्स रद्द करण्यासंदर्भात शासनाचे नेमके काय धोरण आहे? याचीही माहीती देण्याचे आदेश हायकोर्टने दिलेत. ही सर्व माहिती शासनाने येत्या बुधवारी सकाळी अकरा वाजता न्यायालयात सादर करावी. हा सर्व तपशील तपासल्यानंतर आम्ही याबाबत योग्य ते आदेश देऊ असे स्पष्ट करत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.