शक्ती मिल गँगरेप : 'त्या' नकोशा पण उल्लेखनीय आठवणी!

शक्ती मिल गँगरेप प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय... ही घटना घडल्यानंतर सहा महिन्यात त्याचा निकालही लागला.... अनेक दृष्टीनं हा खटला ऐतिहासिक ठरलाय... 

Updated: Aug 22, 2014, 12:26 PM IST
शक्ती मिल गँगरेप : 'त्या' नकोशा पण उल्लेखनीय आठवणी! title=

मुंबई : शक्ती मिल गँगरेप प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय... ही घटना घडल्यानंतर सहा महिन्यात त्याचा निकालही लागला.... अनेक दृष्टीनं हा खटला ऐतिहासिक ठरलाय... 
दिल्लीत निर्भयावर झालेल्या बलात्कारानंतर देशात प्रचंड उद्वेग होता... तो शांत होतो न होतो तोच पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेनं देशातलं वातावरण ढवळून निघालं... आणि हे सगळं घडलं सगळ्यात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत... २२ ऑगस्ट २०१३ याच दिवशी शक्तीमील कम्पाऊंडमध्ये फोटो जर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार झाला होता.

ऐतिहासिक खटला...
...आणि मग सुरू झाला एक खटला... जो अनेक मुद्द्यांच्या आधारावर ऐतिहासिक ठरला... या खटल्यादरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. ती म्हणजे याच नराधमांनी आणखी एका तरुणीवर ३१ जुलै २०१३ला सामूहिक बलात्कार केला होता. ती मुलगीही धैर्यानं पुढे आली आणि पोलिसांची बाजू आणखी भक्कम झाली. 

या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी जवळपास ९६२ पानांचं आरोपपत्र दाखल केलं. ८० साक्षीदार तपासले... कलम ३७६ D गँगरेप, कलम ३७७ अनैसर्गिक संभोग, कलम 341,342, बेकायदा डांबून ठेवणं, कलम 201 पुरावे नष्ट करणं, कलम 34 समान उद्देश, 120 B - IPC गुन्हेगारी कट रचणं ही कलमं आरोपींवर लावण्यात आली. घटनास्थळी मिळालेले कपड़े, आरोपींचे कपडे आणि फोटो जर्नालिस्टचे कपडे यांचा डीएनए रिपोर्ट, फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट, फोटोजर्नालिस्टनं मॅजिस्ट्रेट समोर दिलेला जबाब, डीएनए रिपोर्ट, केमिकल अॅनालिस्ट रिपोर्ट, आरोपी आणि फोटो जर्नालिस्टच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन, फोटो जर्नालिस्टला जागा साफ करायला लावलेली ओढणी, ज्या काचेच्या तुकड्यानं या मुलीला धमकावण्यात आलं होतं त्या बीअरच्या बाटलीचा काचेचा तुकडा आणि घटनास्थळावरून मिळालेले पुरावे या आधारावर क्राईम ब्रान्चनं आरोपपत्र तयार केलं. 

घटनेनंतर फक्त ७२ तासांच्या आत आरोपींना अटक झाली आणि  एका महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल केलं... यावेळी, एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.


यांना मिळाली फाशीची शिक्षा

दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कारानंतर नवा कायदा करण्यात आला. या नव्या कलम ३७६ डी नुसार शक्ती मिल बलात्कार प्रकरणातल्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. एकच गुन्हा वारंवार केल्यास हे नवं कलम ३७६ डी लागू केलं जातं... शक्ती मिलमध्ये फोटो जर्नलिस्ट आणि त्याआधी टेलिफोन ऑपरेटर या दोघींवरही याच नराधमांनी बलात्कार केला होता. त्यामुळे या दोषींना कलम ३७६ लागू झालं... आणि  सलीम अंसारी, क़ासिम बंगाली, विजय जाधव या तिघांना  फाशीची शिक्षा तर, अश्फाक शेख आणि शिराज रेहमानला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि इतर दोन अल्पवयीन दोषींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. 

बलात्कार झाल्यानंतर आठवडाभरात आरोपींना अटक झाली महिनाभरात आरोपपत्र दाखल झालं, आणि सहा महिन्यांच्या आत खटला निकाली निघाला.... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.