शक्ती मिल गँगरेप प्रकरण, दोघं अल्पवयीन आरोपी दोषी

मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयानं आज दोषी ठरवलंय. या दोघांच्याही वर्तनात सुधार व्हावा म्हणून त्यांना नाशिकमधील बोस्टन शाळेत पाठवण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. 

Updated: Jul 15, 2014, 05:25 PM IST
शक्ती मिल गँगरेप प्रकरण, दोघं अल्पवयीन आरोपी दोषी title=

मुंबई: मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयानं आज दोषी ठरवलंय. या दोघांच्याही वर्तनात सुधार व्हावा म्हणून त्यांना नाशिकमधील बोस्टन शाळेत पाठवण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. 

मुंबईतील महालक्ष्मी इथल्या शक्ती मिल इथं गेल्या वर्षी २२ ऑगस्ट रोजी एका फोटोजर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच नराधमांना अटक केली होती. यानंतर एका टेलिफोन ऑपरेटर तरुणीनंही सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. छायाचित्रकार तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. 

या दोन्ही प्रकरणांमध्ये विजय जाधव ( वय १९), मोहम्मद कासीम शेख ऊर्फ कासीम बंगाली (वय २१) आणि सलीम अन्सारी (वय २८), सिराज खान (वय ३२),  आशफाक शेख (वय २६) या नराधमांसह दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यातील पाच आरोपींना मार्चमध्येच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

तर दोन अल्पवयीन आरोपींविरोधात बाल न्यायालयात खटला सुरु होता. बाल न्यायालयानं आज या दोन्ही अल्पवयीन आरोपींना दोषी ठरवलं. तसंच त्यांना तीन वर्षांसाठी नाशिकमधील बोस्टन शाळेत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.