मुंबई : पाकिस्तानी गायक, कलाकार, क्रिकेटपटूंना कडाडून विरोध करणाऱ्या शिवेसेनेने आता पाकिस्तानी अभिनेत्यांना टार्गेट केले आहे. अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान हे दोघे आता सेनेच्या रडारवर आहेत.
फवाद आणि माहिराच्या चित्रपटाला शिवसेनेने विरोध दर्शवला असून त्यांना महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रमोशन करू न देण्याची शपथच शिवसेनने घेतली आहे. याप्रकरणी संबंधित चित्रपट दिग्दर्शकांना शिवसेना पत्र पाठवणार आहे.
फवाद खानने गेल्या वर्षी सोनम कपूर सोबत 'खूबसूरत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला असून येत्या काळाही त्याच्याकडे अनेक चांगल्या ऑफर्स आहेत. लवकरच तो धर्मा प्रॉडक्शनच्या 'कपूर अँड सन्स' आणि रणबीर कपूर - अनुष्का शर्मा- ऐश्वर्या राय या स्टारकास्टसह 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात झळकणार आहे.
पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री, सौंदर्यवती माहिरा खान ही बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानसोबत 'रईस' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
आम्ही कोणताही पाकिस्तानी क्रिकेटपटू, अभिनेता किंवा कलाकाराला महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका चित्रपट सेनेचे जनरल सेक्रेटरी अक्षय बर्दापूरकर यांनी मांडली आहे.
यापूर्वी शिवसेनेने पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली खान यांना विरोध दर्शवल्याने त्यांचा मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रम रद्द करावा लागला होता. तसेच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनापूर्वी शिवसेनेने विरोध दर्शविला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.