मुंबई : शिवसेना नेत्यांच्या मुख्यमंत्री भेटीचा बार अखेर फुसकाच ठरलाय. 'वर्षा' बंगल्यावर रात्री झालेल्या या भेटीची चर्चा बुधवार दुपारपासूनच रंगली होती.
शिवसेना-भाजपामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यामुळे त्याभोवती गूढतेचं वलय निर्माण झालं होतं. शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, दिपक सावंत आणि दीपक केसरकर राजीनामे देण्यासाठी तर जात नाहीत ना, अशी चर्चाही रंगली.
मात्र, अल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यासाठी ही भेट झाल्याचं स्पष्ट झालंय. त्याच वेळी या आपण राजीनामे खिशात ठेवून फिरतो, हे सिद्ध करण्यासाठी रावतेंनी पत्रकारांना राजीनामाच बाहेर काढून दाखवला. 'आमच्या पक्षात आदेश चालतो. सूचना, प्रस्ताव चर्चा चालत नाही... राजीनामा हा सर्व मंत्र्यांच्या खिशात असल्याचा' दावाही रावते यांनी केला.
दरम्यान, याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.
सत्तेतून बाहेर जाण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर सरकारला पाच वर्ष कोणताही धोका नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता भाजप प्रदेशाध्यक्षांनीही मुख्यमंत्र्यांच्या सूरात सूर मिसळलाय. नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ दानवेंनी फोडला. यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.