भाजपसोबत मतभेदांवर सेना आमदारांची बैठक

शिवसेना आमदारांची एक महत्त्वाची बैठक ३ तारखेला मुंबईत होतेय. या बैठकीमध्ये भाजपासोबत वाढत असलेल्या मतभेदांवर चर्चा होणार आहे, तसंच सरकारमधून बाहेर पडण्याबाबत आमदार काय भूमिका मांडतात, हेदेखील स्पष्ट होणार आहे.

Updated: Oct 30, 2015, 11:05 AM IST
भाजपसोबत मतभेदांवर सेना आमदारांची बैठक title=

मुंबई : शिवसेना आमदारांची एक महत्त्वाची बैठक ३ तारखेला मुंबईत होतेय. या बैठकीमध्ये भाजपासोबत वाढत असलेल्या मतभेदांवर चर्चा होणार आहे, तसंच सरकारमधून बाहेर पडण्याबाबत आमदार काय भूमिका मांडतात, हेदेखील स्पष्ट होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांच्या भावना जाणून घेणार आहेत. तसंच वर्षभराच्या कामकाजाचा आढावाही घेतला जाणार आहे. १ तारखेला महापालिका निवडणुकांचे निकाल आहेत. त्यावरही अर्थातच या बैठकीत चर्चा रंगेल... पण सरकारबाबत आमदार काय मत मांडतात, हाच बैठकीचा कळीचा मुद्दा असेल.

तुझं - माझं जमेना... 
राज्यातील सरकारला 31 ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असताना सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील संघर्ष टीकेला पोहचला आहे. दोन्ही पक्षात सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आणि मतभेद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात चव्हाट्यावर आले आहेत. 

राज्यात 15 वर्षानंतर सत्तांतर होऊन 31 ऑक्टोबर 2014 रोजी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत विराजमान झाले. महिनाभराने शिवसेनाही या सरकारमध्ये सहभागी झाली. आता हे सरकार आपली पहिली वर्षपूर्ती साजरी करत आहे. मात्र ही वर्षपूर्ती साजरी करत असतानाच सत्तेत सहभागी असलेले शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून शिवसेना-भाजपाचे नेतेचं एकमेकांची उणीदुणी काढताना दिसत आहेत. शिवसेना-भाजपाच्या या लढ्यात विरोधकही या दोन्ही पक्षांवर आणि सरकारवर तोंडसुख घेत आहे. विधानसभा निवडणुकीत अशीच उणीदुणी काढल्यानंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले होते.

सरकारची पहिली वर्षपूर्ती होत असतानाच शिवसेना-भाजपामध्ये सध्या तुझं-माझं जमेना अशी स्थिती आहे. मात्र सत्तेसाठी दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. त्यामुळेच एकमेकांवर टोकाची टीका करायची आणि आमचे सरकार पाच वर्ष टिकेल असेही सांगायचे. त्यामुळे या पक्षांचे आणि सरकारचं चाललंय तरी काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.