www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे राज्याचा एक लोकनेता हरपला आहे, अशी प्रतिक्रीया निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून तीव्र दु:ख व्यक्त करत आपल्यासाठी आजची सकाळ दुर्दैवी ठरली, असे ते म्हणालेत.
विकासाचा दृष्टिकोन असेलेले लोकनेते म्हणून मुंडे हे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात परिचित होते. त्यांना प्रचंड जनाधार होता. ग्रामीण जनतेसह समाजाच्या विविध प्रश्नांची त्यांना बारकाईने जाण होती. त्यामुळेच त्यांच्यावर आता केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. एक मोठी संधी मिळालेली असताना असा दुर्दैवी प्रसंग ओढवल्याने तीव्र वेदना होत आहेत.
मुंडे यांचे राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा बुलंद आवाज लुप्त झाला आहे. राज्याच्या हितासाठी नेहमीच त्यांनी सर्वांनाबरोबर घेऊन काम करण्याची भूमिका बजावली. म्हणूनच त्यांना जनमाणसांत प्रचंड लोकप्रियता लाभली होती. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन जनसेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.