नवी दिल्ली: मराठी चित्रपटांना प्राईमटाईम देण्यावरुन वादग्रस्त ट्विट करणाऱ्या शोभा डे यांना आज सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग नोटीशीला स्थगिती दिली आहे.
मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी प्राईमटाईममध्ये एक शो सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं काही दिवासंपूर्वी घेतला होता. या निर्णयाविरोधात शोभा डे यांनी ट्विटरवर वादग्रस्त ट्विट केलं होतं. फडणवीस सरकार हुकुमशहा असल्याचं शोभा डे यांनी म्हटलं होतं. यावरुन शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारत शोभा डे यांना हक्कभंगाची नोटीसही बजावली होती.
मंगळवारी शोभा डे यांनी या नोटीशीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानं हक्कभंगाच्या नोटीशीला स्थगिती दिली असून यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारकडून उत्तर मागवलं आहे. उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.