www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मोसमातल्या रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद चंद्रपुरात झालीय. चंद्रपुरात पारा ४७ पूर्णांक ६ अंशांवर गेलाय. प्रचंड उकाड्यामुळं नागरिक हैराण झालेत. शनिवारी चंद्रपूरचे तापमान ४३ अंश सेल्सियस होतं.
मात्र रविवारी हे तापमान अचानक ४७.६ च्या पार गेलं... अचानक उकाडा वाढल्याने दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य झाले होते. आवश्यक कामांसाठीच नागरिक घराबाहेर पडत असून बाहेर पडतानाही कान-चेहरा रुमालाने झाकण्याची काळजी घेतायत.
आधीच दुष्काळाचे चटके सोसत असताना आता तापमानाच्या वाढत्या पा-यानं जळगावकर हैराण झालेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मध्ये ४५ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झालीये तर जळगावातही पारा ४३.५अंशावर चढलाय.
या एप्रिल हीट मुळे नागरीकांना भर उन्हात घराबाहेर पडणं कठीण झालंय. यामुळे दुपारी रस्ते ओस पडलेत. कामा निमित्त बाहेर पडणाऱ्यांनाही शितपेय आणि थंड पाण्याचा आधार घ्यावा लागतोय. अजून मे महिन्यातील वैशाख वणवा बाकी आहे. त्याआधीच पारा चढल्यानं नागरीक धास्तावलेत.
प्रमुख शहरांतील तापमान
पुणे ४०.८, लोहगाव ४१.४ , अहमनगर ४३.२, जळगाव ४२.९ कोल्हापूर ३९.५, महाबळेश्वर ३३.१, सांगली ४१.२, सातारा ४१.८, सोलापूर ४२, नाशिक ३९, मुंबई ३३.२ , अलिबाग ३३.६, डहाणू ३४.७, औरंगाबाद४१.१, परभणी ४२.८, नांदेड ४२.५,
अकोला ४४.५, अमरावती ४४.८, चंद्रपूर ४७.६, गोंदिया ४१.१, नागपूर ४४.४, वाशीम ४२, वर्धा ४३.२, यवतमाळ ४३.२