`तेजाब`चे फायनान्सर दिनेश गांधी यांचा होरपळून मृत्यू!

मुंबईच्या कॅम्प्स कॉर्नर भागातील आलिशान २६ मजली टॉवरला लागलेल्या आगीत सात लोकांचा बळी गेलाय तर सात जखमी झालेत. चित्रपट निर्माते दिनेश गांधी यांचा या आगीत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 15, 2013, 02:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या कॅम्प्स कॉर्नर भागातील आलिशान २६ मजली टॉवरला लागलेल्या आगीत सात लोकांचा बळी गेलाय तर सात जखमी झालेत. चित्रपट निर्माते दिनेश गांधी यांचा या आगीत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
दिनेश गांधी यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी अर्थपुरवठा केला होता. कॅम्प्स कॉर्नरच्या बाराव्या मजल्यावर त्यांचं कुटुंब राहत होतं. शनिवारी इमारतीला लागलेल्या आगीत दिनेश गांधी आणि त्यांची पत्नी देवयानी गांधी हे दोघेही बळी पडलेत. दिनेश गांधी यांची पत्नी देवयानी या घटनेच्या वेळी जॉगिंगला गेल्या होत्या. आगीचे वृत्त समजताच त्या लिफ्टने १२ व्या मजल्यावर गेल्या. आगीचा लोळ आल्यामुळे लिफ्टमन अजय सिंह आणि देवयानी हे दोघेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. तर १७ व्या मजल्यावर काम करणारा चित्तरंजन दास आणि २६ व्या मजल्यावर काम करणारी सुमित्रा शिगवण यांनी घाबरून खालच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या दोघांचाही गुदमरून मृत्यू ओढवला.
दिनेश गांधी यांनी तेजाब, पनाह, साहेब, तिरंगा, हम, अरमान अशा अनेक चित्रपटांना आर्थिक पाठबळ दिलं होतं. दिनेश गांधी (६५), देवयानी गांधी (६५), अजय सिंग (३५), भुरालाल पेराचंद मुगालिया (४०), छोटू (१७ वर्षे), चित्तरंजनदास रामचंद्रदास (४०), सुमित्रा सुरेश शिगवण (४२) अशी या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.