मुंबई : टोलमुक्तीचं आश्वासनं देत सत्तेत विराजमान झालेल्या फडणवीस सरकारनं टोलमुक्तीवर यू-टर्न घेतलाय.. राज्यात संपूर्ण टोलमुक्ती अशक्य असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत म्हटलंय.
राज्यातील टोल संपूर्ण बंद होणार का असा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासाला विचारण्यात आला. तेव्हा राज्यात मुंबई एंट्री पॉइंटचे 5 आणि मुंबई पुणे एक्सप्रेसचे 7 असे 12 टोल हे हलक्या जड़ वाहनांकरता सुरु आहेत... बाकी 53 टोल हे हलक्या वाहनाकरता बंद केले आहेत, इथे फक्त जड़ वाहनांकरता टोल सुरु आहेत.
राज्यात नवीन टोल धोरण जाहीर करतांना रस्त्याच्या कामाची किंमत 200 कोटीपेक्षा कमी असलेल्या रस्त्यावर टोल लावला जाणार नाही. ज्या रस्त्याचे काम 200 कोटींपेक्षा जास्त असेल तिथे फक्त जड वाहनांवर टोल लावला जाईल असं पाटील यांनी स्पष्ट केलंय.
नवीन टोल धोरणात वाहनांची संख्या नोंदवल्यावर टोल वसूलीचे पैसे कमी झाल्याचे दाखवलं जाईल असं सॉफ्टवेअर विकसित केले जात असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. थोडक्यात टोल संपूर्ण बंद होतील का या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अप्रत्यक्षपणे का होईना राज्यात टोलमाफी किंवा टोल बंद होणार नाहीत असे सार्वजनिक बांधकाम यांनी सांगितले.