www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हे वर्ष निवडणुकीचे आहे. निवडणूक जिंकलो नाही तर शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक म्हणून घ्यायला आपण नालायक, कपाळकरंटे आहोत, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलंय. मराठी भाषा दिनानिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शिवसेना कार्यक्रर्त्यांना सदैव जागते राहण्याचा मंत्र उद्धव यांनी दिला. बांग्लादेशी मतदार बनून मतदान करतात. आपण पाच वर्षे मर मर करतो आणि मतदानाच्या दिवशी घरात वर टांग करून पिक्चर बघतो. त्यामुळे सावध राहा. बांग्लादेशी आणि उपर्यांचे ओझे आपल्या खांद्यावर घ्यायचे नाही. देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची आहे, असे उद्धव म्हणालेत.
याप्रसंगी मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत नाथा खराडे, मनसेचे आटपाडी तालुका अध्यक्ष नीळकंठ देशपांडे आणि मनसेचे कृषिविभागाचे आटपाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब नेटकरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या मनसे कार्यकर्त्यांच्या हाती भगवा देऊन त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला, तर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्यअहवालाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
उद्धव ठाकरे यांची मुले इंग्रजी शाळेत शिकतात, अशी शेरेबाजी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. माझी मुले मराठी विसरलेली नाहीत. आमच्या घरात मराठीच बोलतात. माझी मुले इंग्रजी माध्यमात शिकली तरी माँसाहेब यांनी घरात तुळशीवृंदावनाचे फ्लॉवरपॉट होऊ दिले नाही. आम्ही संस्कृतीबरोबर भाषाही जपली असे सांगतानाच माझा मुलगा मराठी कसा बोलतो हे त्यांनी बघितले आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ